: सिल्लोड, (प्रतिनिधी) : बोदवड (ता. सिल्लोड) येथील शेतकरी कन्या मयुरी रामराव गव्हाणे हिची इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात पहिल्याच प्रयत्नात निवड झाली. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी तिच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मयुरी, तिचे वडील रामराव गव्हाणे व आई वंदना यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आमदार सत्तार यांनी मयुरीच्या यशाचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मयुरीने कठोर परिश्रम, चिकाटी व आत्मविश्वासाच्या भारतीय सैन्य दलात प्रवेश जोरावर मिळवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावाचा नावलौकिक वाढविला आहे.
ग्रामीण भागातील तरुणींनी शिक्षण व कष्टाच्या जोरावर देशसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या वेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी मयुरीच्या यशाचे विशेष कौतुक केले. आजच्या
काळात मुलींनी कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता देशसेवेसाठी पुढे येणे ही अभिमानाची बाब आहे. मयुरीसारख्या मुली समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, असे ते म्हणाले.
तसेच तिच्या पुढील प्रशिक्षण व सेवाकालासाठी शुभेच्छा देत तिने देशसेवेत उल्लेखनीय कार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख देविदास लोखंडे, कृउबा समितीचे संचालक राजाराम पाडळे, भावराव लोखंडे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, राहुल गव्हाणे, रामेश्वर सुरडकर, संतोष लहाने आदींसह गावकरी उपस्थित होते.












